Wednesday 22 August 2012

राज ठाकरे यांची सभा : ‘मियॉं की दौड मज्जीद तक’


राज ठाकरे यांची सभा : ‘मियॉं की दौड मज्जीद तक’

- शैलेश राजपूत


कालची राज ठाकरे यांची आझाद मैदानावरील सभा पाहिली की असंच म्हणावसं वाटतं की ‘मियॉं की दौड मज्जीद तक’! आसाम आणि म्यानमार येथे मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी लाखांच्या घरांत मुसलमानांचा जमाव गोळा झाला. तिथे झालेल्या सभेनंतर जमावाने हैदोस घालण्यास सुरुवात केली. पोलीस व माध्यमांना लक्ष्य केले. त्यात महिला पोलिसांववरही अत्याचार झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीकर राज यांचा कालचा मोर्चा आणि सभा होती, पण या सभेत राज यांनी मुजोर झालेल्या या आतंकी प्रकृत्तीवर बोलण्याची हिम्मतच केली नाही. त्यांनी केवळ गृहमंत्री व मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर शरसंधान करून आपली पॉप्युलॅरीटी कायम ठेकली. या वेळी राज केवळ ‘पॉलिटीकली करेक्ट’ होते.

कालच्या मोर्चाच्या विषयात दोन दिवस आधीपासूनच माध्यमांमध्ये ‘राज ठाकरे ‘हिंदुत्व कार्ड’ खेळणार का?’ याबाबत चर्चा होती. मोर्चाच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राज ठाकरें यांना हे प्रश्‍न विचारले गेले. मात्र राज यांनी आपले धोरण आपण उद्याच्या सभेत स्पष्ट करू, असे सांगून सर्वांना तंगवत ठेकले. मनसेच्या आमदारांना काल मोर्चादरम्यान पत्रकारांनी ‘हिंदुत्वा’बाबत प्रश्‍न विचारता ते अंगाकर पाल पडल्यासारखे विषय झटकत होते. त्याचप्रमाणे राज यांनीही सभेत आपण कोणत्याही एका धर्मापुरते नसून आपल्याला ‘महाराष्ट्र धर्म’ कळतो, असे म्हणाले. राज यांचा महाराष्ट्र धर्म आणि समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ‘महाराष्ट्र धर्मा’ची शिकवण दिली त्यात जमीन-अस्मानीचे अंतर आहे.
राज ठाकरेंना केवळ ‘राज’कारण करायचे आहे. कालच्या सभेत त्यांनी अनेक प्रासंगिक मुद्यांना बगल देत उगाच नसते विषय उपटून काढले. जसे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांना शह देण्यासाठीचा ठोबळे या पोलीस अधिकार्‍यांचा मुद्दा.

राज ठाकरेंनी आजपर्यंत जितक्या विषयात लक्ष घातले आहे त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठोस कृती कार्यक्रम दिला आहे. जसे ‘भैय्या हटाव आंदोलन’, ‘टोलविरोधी आंदोलन’; पण कालच्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताच कृती कार्यक्रम दिलेला नाही. त्यांनी आपल्या भाषणात बांग्लादेशी मुसलमानांचा उल्लेख केला, पण त्यांना हुडकून बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रयत्न करावेसे वाटत नाही.

राजकारणाचा समाजकारण व राष्ट्रकारणाशी संबंध असणे गरजेचे आहे. राज यांची कालची सभा नुसते चर्चेचे गुर्‍हाळ उत्पन्न करील. या सभेचा ना आसामातील दंगलीशी काही संबंध, ना त्यानंतर देशभरात उत्पन्न झालेल्या पूर्वांचलकासीयांच्या सुरक्षेशी. काठीला काठीने उत्तर देण्याची भाषा करणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेकडे पूर्वांचलातील बांधवांच्या समस्येसाठी काही उत्तर नाही. राज स्वत:ला महाराष्ट्राचे नेते म्हणवतात, पण राज ठाकरे यांची ही कृती महाराष्ट्राला लाजवणारी आहे. कारण याआधीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी, समाजधुरीणांनी अखिल राष्ट्राच्या कल्याणाची मांडणी केली आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अनिल काकोडकरपर्यंतच्या अखिल भारतीय कार्याची जाणं राज यांनी ठेवायला हवी होती.