Wednesday, 22 June 2011

गोपीनाथांचं काय चुकलं?



‘भारतीय जनता पक्ष‘ म्हणजे मुळचा ‘भारतीय जनसंघ’ याची प्रारंभापासूनची ओळख  'A Party of Difference' आहे आणि आज तो देशातील एक मोठा पक्ष आहे. तसेच गेल्या ६२ वर्षांत कॉंग्रेसला सक्षम पर्याय म्हणून हाच एकमेव पक्ष आहे. म्हणजे देशात लोकशाही व्यवस्था स्थिर ठेवण्यात याचा खूप मोठा वाटा आहे. अन्यथा राज्यव्यवस्थेत कॉंग्रेसची मक्तेदारी झाली असती. कारण गेल्या साठ वर्षांत कॉंग्रेसला पर्याय म्हणून कोणताही पक्ष या खंडप्राय देशात सक्षमपणे उभा राहू शकलेला नाहीय. कॉंग्रेस व भाजपा व्यतिरिक्त जे अन्य चार राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं बस्तान एखाद-दोन राज्यांपेक्षा जास्त बसलेलं नाही.

हे झालं भाजपचं भारतीय राज्यव्यवस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण स्थान. सध्या महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गोपीनाथ मुंडे किंवा इतर कोणत्याही भाजप नेत्याबद्दल विचार करताना आपल्याला मूळता ‘भाजप’चा विचार करणं गरजेचं आहे.

गोपीनाथराव हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव कायम चर्चेत आहे. ते मूळचे मराठवाड्यातील असून त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची जाणं आहे. ते अन्य मागासवर्गीय जातीचे आहेत. गोपीनाथरावांचा राजकारणातील उदय आणि कार्यकाळ पाहता एक गोष्ट लक्षात येते ती ही की, गोपीनाथरावांचं ‘पॉलिटिकल करिअर’ हे भाजपव्यतिरिक्त कोणत्याही पक्षात होऊ शकलं नसतं. गोपीनाथ मुंडेंना राष्ट्रवादीत स्थान नाही कारण महाराष्ट्रातील दुसरे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचीच सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गळचेपी होतेय. दोन्ही कॉंग्रेस या ‘मराठा’ जातीचे राजकारण करणार्‍या आहेत. विद्यापीठ नामांतराच्या काळातील शिवसेनेची भूमिकाही ज्ञात आहे. त्यामुळे मुंडेंसारख्या एका ग्रामीण नेत्याला दिल्लीपर्यंत नेऊन बसवण्याची किमया केवळ भाजप करू शकला.

गोपीनाथ मुंडे यांचे कर्तृत्व खरंच ‘प्रचंड‘ असंच म्हणावं लागेल. मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गापर्यंत मर्यादित असलेल्या भाजपाला त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारलं. ऊस, कापूस, शेतीविषयक अनेक विषयांवर रान पेटवलं. ते ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज झाले. शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याला विरोधी बाकावर बसवण्याची किमया त्यांनी महाराष्ट्रात करून दाखवली. युतीच्या शासनकाळात ते गृहमंत्री होते. त्या काळात त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवून दाखवलं. असे मोठे जनाधार असलेले नेते म्हणून मुंडे ओळखले जाऊ लागले.

पण प्रश्‍न असा उपस्थित होतो की सत्ता आली, खूर्ची मिळाली; त्यानंतर मात्र मुंडेंचा आवाज क्षीण का होताना दिसला? ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्‍न हिरीरिने मांडणार्‍या मुंडेंच्या शस्त्राची धार नंतर बोथट का झाली? दरम्यानच्या काळात नितीन गडकरी, विनोद तावडे यांचेही नवे नेतृत्व भाजपामध्ये उदयाला आले. गडकरी विदर्भाचे प्रतिनिधित्व करतात, तर तावडे कोकणाचे. आतापर्यंत महाराष्ट्र म्हणजे मुंडे असे समीकरण होते ते आता बदलू लागले. गडकरी-तावडे व अन्य हे मुंडेंनंतर आलेले. मुंडेंनी त्यांचे मार्गदर्शन करून महाराष्ट्रात भाजपला सक्षमपणे उभे करण्याची गरज होती. महाराष्ट्रात भाजपातील वडीलकीच्या नात्याने ते हे करू शकले असते पण महाराष्ट्रात चित्र उलटे दिसले. मुंडे-गडकरी गटा-गटांत विभागले गेले.

अनेक विषयांत गडकरींनी कठोर भूमिका घेतली होती त्यामुळे गडकरी भाजपमधील तरुण कार्यकर्त्यांचे आदर्श झाले. शिवसेना महाराष्ट्रात भाजपला संघटनात्मक वाढू देत नाही असा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा अनूभव आहे. गडकरींनी सत्तेच्या शुल्लक राजकारणापेक्षा पक्ष संघटनेला महत्त्व दिले. शिवसेनेच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षात त्यांचे स्थान वाढले. कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटू लागले.
२००९च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकांनंतर मुंडे व गडकरी हे दोघंही नेते दिल्लीत गेले. दिल्लीत मुंडेंना मानाचे स्थान मिळाले. राजकारणाचा ३० वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभव असलेल्या नेत्याने दिल्लीत सक्षम राजकारण करण्याची गरज आहे. महागाई, भ्रष्टाचार, शेती, सुरक्षेच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेसला चारही दिशा चित करण्याची गरज आहे. अशावेळी मुंडे मात्र माझ्या माणसाला मुंबई भाजपाचं अध्यक्ष केले नाही, पुणे भाजपाचे अध्यक्ष केले नाही अशा शुल्लक विषयांवर राजकारण करत आहेत. सध्याची देशाची स्थिती पाहता मुंडेंचे हे ‘शुल्लक’ राजकारण निंदनीय आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे भाजप ही  'A Party of Difference' आहे. मुंडेंनी याचे भान ठेवून आपले राजकारण करावे. मुंडेंच्या शुल्लक राजकारणाने भाजपाची ‘कॉंग्रेस’ होतेय का? असा प्रश्‍न पुन्हा उभा राहतोय!

Thursday, 5 May 2011

तू प्रकाश हो !

तू प्रकाश हो !
अंधाराला भिऊ नको.


तो कितीही दाट असला,
तो कितीही भयाण असला,
तरी....
तरी तुझ अस्तित्व म्हणजेच त्याचा अंत आहे.
तू प्रकाश हो !


तू भेदक आहेस,
तू तिष्ण आहेस,
तू मार्मिक आहेस....
तू प्रकाश हो !


जीवन म्हणजे जरी
संकटांचं, प्रश्नांचं,
अंधाराचं गाठोडं....
या गाठोड्याला राख करणारं तूच...
तूच ते तत्त्व आहेस !
तू प्रकाश हो !


बाहेरील ऊर्जा क्षणीक असेल,
तू खरा सूर्य हो !
तू प्रकाश हो !


आणि तू प्रकाश होण्यास यशस्वी झालास
की तिथेच थांबू नकोस,
दुसर्‍यांनाही प्रकाशमान कर !
हाच खरा दीप संदेश !
तू प्रकाश हो !


                                                  - शैलेश

(ही कविता मी २००९ साली ’सा. विवेक’च्या दीपावली मीलनात सादर करण्यासाठी तयार केली होती)

Wednesday, 4 May 2011

संघ परिवार???



           डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाचं संघटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना केली. पुढे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनीही ‘‘संघ हे समाजातील एक संघटन नसून ते संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आहे’’ असे प्रतिपादन केले होते. आजची प्रत्यक्ष स्थिती मात्र अगदी विपरीत दिसते आहे. संघ हे समाजाचे संघटन न होता, समाजातील एक संघटन झाल्यासारखे वाटत आहे, म्हणजेच संघ संस्थारूप झाला आहे.
       
         हल्ली सगळीकडे ‘संघ परिवार’ हा शब्द ऐकायला मिळतो. ‘संघ परिवार’ म्हणजे संघाच्या माध्यमातून किंवा ज्या संस्थांमध्ये संघाचे स्वयंसेवक/कार्यकर्ते पदाधिकारी आहेत किंवा संघविचारांतून चालणार्‍या संस्था/संघटना असे साधारण स्पष्टिकरण दिले जाते. हो.वे. शेषाद्रीजींनी लिहिलेल्या ‘उगवे संघ पहाट’ या पुस्तकातही संघाच्या या संस्थाजीवनाचा गोषवारा देण्यात आलेला आहे.
       
          संघ स्वयंसेवक अगदी स्वाभाविक विचार करतात की ‘आपली शाळा’, ‘आपली संस्था’, ‘आपली बँक’, ‘आपली पार्टी’, ‘आपला पेपर’, ‘आपला कार्यकर्ता’..... इथे आपल्याला ‘आपले’ म्हणजे काय अपेक्षित असते? संपूर्ण हिंदू समाज आपला नाही का? जर संपूर्ण हिंदू समाज आपला असेल, तर त्यातील ठराविक विचारांच्याच गोष्टींना आपण आपले का म्हणावे? समाजवाद्यांनीही बर्‍याच शाळा काढल्या. तिथेही चांगले शिक्षण दिले जाते. तर त्या शाळा आपल्या नाहीत का? निदान कॉन्व्हेन्ट शाळांपेक्षा तरी त्या बर्‍या ना! देशात सर्वात मोठा राजकीय वारसा असलेली कॉंग्रेस आपली होऊ शकत नाही का? शिवसेनेसारखा तोंडदेखले का होईना, पण हिंदुत्वाची कास धरणारा राजकीय पक्ष आपला नाही का? समाजात बरेच जण सामाजिक, सांस्कृतिक, सेवा अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत. निस्वार्थ बुद्धीने, प्रामाणिकपणे करत आहेत. ते का आपले नाहीत?

          संघाव्यतिरिक्त इतर सर्व झूट आहे. सगळ्याबद्दल आपल्या मनात साक्षंकता का असते? आपल्या अशा एकांगी विचार करण्याने संघकार्यकर्त्यांमध्ये अभिनिवेश निर्माण होऊ लागला आहे. अशा प्रकारचा अभिनिवेश असणे हा दोषच आहे. याचा पुढचा परिणाम म्हणजे संघविचारांतून सुरू झालेल्या संस्थांमध्येसुद्धा संघच बरोबर बाकीच्या त्यामानाने कमी, अशी भावना हळूहळू आपल्यात येऊ लागते. तो विद्यार्थी परिषदवाला आहे ना म्हणून असा, ते भाजपवाले सगळे असेच!! इत्यादी इत्यादी... आधी संघ म्हणून स्वत:ला समाजापासून दूर करण्याची विकृती आणि ह्याच विकृतीचा परिपाक म्हणजे ‘संघ परिवारा’तसुद्धा आपले-परके करण्याचा मानस! संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्याचे डॉक्टरांचे स्वप्न नव्हे तर त्यांनी आपल्याला दिशादर्शन करून दिलेला मार्ग आपल्या या अंतर्गत विकृतीमुळे आपण चुकलो आहोत का? याची खरंच आज विचार करण्याची गरज आहे.

             सध्या देशात ज्या प्रकारची स्थिती आहे, त्यात देश मोठ्या आशेने संघाकडे बघतो आहे, पण संघाची रचना आपली संघटनात्मक बांधणी करण्यातच लागली आहे. आणीबाणीपूर्व काळात अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली असता बाळासाहेब देवरसांनी संघाची सारी शक्ती जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामागे लावली. याचा परिणाम म्हणून संघावर बंदी येऊ शकेल, संघाच्या शाखा बंद होतील, संघ शिक्षा वर्ग होणार नाहीत या सार्‍याचा विचार बाळासाहेबांनी केला नसेल का? पण समाजासाठी, राष्ट्रासाठी आपली ही आपण आहोत, केवळ ठराविक कार्यपद्धतीसाठी नाही हाच विचार बाळासाहेबांनी केला असावा. म्हणूनच त्यांनी संघाला दुसर्‍या अग्निपरीक्षेत लोटले.



अयोध्येपुरते मर्यादित असलेले ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलन’ राष्ट्रव्यापी करण्याचे श्रेय संघाला जाते. देशात विशाल हिंदू जागरण संघाने यानिमित्ताने केले. पण १९९२ कुठे गेली ही लाट? संघटनात्मकरीत्या पुढे का चालले नाही हे आंदोलन?

              आज निरनिराळ्या क्षेत्रात संघविचारांच्या संस्था/संघटना आहेत, पण निरनिराळ्या संस्था/संघटनांमध्ये संघाचे स्वयंसेवक/कार्यकर्ते का नाहीत? हा विचार केला पाहिजे. समग्र हिंदू समाजाचे संघटन करायला निघालेल्या संघाकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. केवळ संघटनात्मक बांधणीत संघ गुरफटून राहिला तर या कसोटीवर संघ उतरू शकेल का हा प्रश्‍न आहे. संघात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या आहेत आणि अनेक वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांनाही आता प्रश्‍न पडू लागले आहेत. त्यामुळे आता पूनर्विचाराची आवश्यकता आहे, असे वाटते.

- शैलेश राजपूत