Friday 29 July 2011

‘कारगिल विजया’नंतरचे युद्ध


जुलै २६ ला काही शहरांमध्ये बारावा ‘कारगिल विजय दिवस’ साजरा झाला. युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. कारगिल युद्धात तुलनेने ती जास्तच झाली. अनेक जवानांनी प्राणार्पण करून उत्तर टोक भारतात शाबूत ठेवलं. त्यामुळे या जवानांच्या कुटुबियांचे कारुण्य या वेळी व्यक्त होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम झाले. आतापर्यंत हे कार्यक्रम सरकारी आणि सैनिकी पातळीवर होत होते. पण या वर्षी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, वडोदरा, जयपूर, भोपाळ, बंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये तरुणांनी या दिवशी कार्यक्रम आयोजित केले. पण जवळजवळ या सगळ्याच ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं आणि त्यासाठी मेणबत्त्या पेटवणं, एवढंच झालं.

त्यामुळे इथे प्रश्‍न उपस्थित करावासा वाटतो की विजय दिवस म्हणजे काय? तो कसा साजरा करतात? आणि अशा मेणबत्त्या लावून किती काळ श्रद्धांजलीच देत राहणार? श्रद्धांजली देणार्‍यांच्या भावनांची अवहेलना करू इच्छित नाही, पण अशी आपल्याच लोकांची प्रेत आपण किती काळ पाहत राहणार? कारगिल युद्धात मारल्या गेलेल्या एकातरी भारतीय सैनिकाची काही चूक होती का? हे युद्ध आपल्यावर थोपवलं गेलं आणि त्यात आपल्या लोकांचं अनाहूत रक्त सांडलं. विजय दिवशी आपल्याला या सगळ्याची योग्य चिकित्सा करणं गरजेचं वाटत नाही का?

कारगिल युद्धाला एक तप लोटले. काल श्रीनगर येथे कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात माजी सैनिक प्रमुख व्ही. पी. मलिक म्हणाले की, कारगिलसारखे युद्ध पुन्हा होऊ शकते. मलिक हे कारगिल युद्धाच्या वेळी सैन्य प्रमुख होते. त्यांनी येथे म्हटले आहे की, पाकिस्तानातून सतत घुसखोरी सुरू आहे, तसेच हे पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले छद्म युद्ध आहे. याचाच अर्थ पुन्हा केव्हा तरी कारगिलप्रमाणे युद्ध होणार आणि त्याच्या बारा वर्षांनंतर आपण पुन्हा हातात मेणबत्त्या घेऊन आपल्यातील ज्या लोकांचे रक्त सांडले आहे त्यांना सश्रद्ध मनाने आदरांजली देत असणार.

मलिक यांनी ज्या छद्म युद्धाचा येथे उल्लेख केला त्याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कारगिल विजयानंतर म्हणजे २६ जुलै १९९९ नंतर नवी दिल्ली, मुंबई, पुणे, वाराणसी, बंगळुरू, गुवाहाटी अशा देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात बॉम्बस्फोट झाले. देशाचे सर्वोच्च ठिकाण समजल्या जाणार्‍या संसदेवर हल्ला झाला. २६/११ चा मुंबई हल्ला, अक्षरधाम मंदिरावरील हल्ला, या सगळ्या घटना कारगिल विजयानंतरच्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तर दहशतवाद हा रोजचा झाला आहे.

विजय मिळवल्यानंतरही आपण लढतोच आहोत किंवा मरतोच आहोत, हेच म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्यामुळे जर नुसत्या मेणबत्त्या लावण्याची पद्धत तरुणांना अंगवळणी पडली तर हा देश संपेपपर्यंत आपण मेणबत्त्याच लावत राहू.

नुकतेच मुंबईत बॉम्बस्फोट झाले आहेत. त्याने देशापुढील दहशतवादाचे संकट पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दहशतवाद ही जागतिक समस्या म्हटली आहे. अमेरिका, इंग्लंड, इस्राएल व भारत हे राष्ट्रे दहशतवाद्यांची प्रमुख लक्ष्य आहेत. अशा वेळी तरुणांना या छद्म युद्धाचा सामना करण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांनी भारताला लक्ष्य का केले याचीही परखड कारणमिमांसा करणे आता गरजेचे झाले आहे.
दहशतवादाचे अंतरंग

दहशतवाद जरी आंतरराष्ट्रीय समस्या असली तरी भारताच्या/बाबतीत सांगायचे झाले तर त्याचा मूल स्रोत हा पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून पाकिस्तान भारताला आपला क्रमांक एक शत्रू मानतो. त्यामुळे दहशतवादाचा सामना करताना पाकिस्तानबाबत आपल्या मनातील भाबड्या भावनांना तिलांजली देणं सर्वाधिक गरजेचं आहे.

आपल्या दृष्टीने पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी यात अंतर आहे. पण पाकिस्तानच्या दृष्टीने तसे नाही आहे. कारण दोघांच्या कार्यपद्धतीत फरक असला तरी उद्देश एकच आहे. कार्य एकच आहे. यातील सैनिक या घटकाला अधिकृतपणे व दहशतवाद्याच्या अनधिकृतपणे राजाश्रय आहे. हे पाकिस्तानचे धोरण आहे.

पुढे प्रश्‍न येतो दहशतवाद्यांच्या प्रेरणेचा. दहशतवादाची मूळ प्रेरणा ही त्यांचा धर्म म्हणजेच ‘इस्लाम’ आहे. इस्लाममधील ‘जिहाद’सारख्या संकल्पना त्यांचा या मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करतात. अनेक पाश्‍चात्त्य अभ्यायकांनी या मनोवृत्तीचा अभ्यास करून या सगळ्याचा मूल स्रोत इस्लाम असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे ख्रिश्‍चनांना विरोध म्हणून अमेरिका व युरोपीय देशांशी शत्रूत्व, ज्यूंना विरोध म्हणून इस्राएलशी शत्रूत्व; त्याचप्रमाणे हिंदुंना विरोध म्हणून भारताशी शत्रूत्व. आपल्याला सहसा मान्य होणार नसले तरी पाकिस्तानच्या भारतद्वेषाचे मूळ कारण हे धर्म आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही अंगिकारली. तरीही जगाच्या दृष्टीने भारत हा हिंदुंचा देश आहे. त्यामुळे हिंदुंद्वेषापोटी पाक आपल्यावर ही युद्धे लादत आहे. हे वास्तव स्पष्टपणे तरुणांना सांगण्याची आज गरज आहे.

कारगिल विजयानंतरची बारा वर्षे ही युद्धजन्य स्थितीतच गेली, पण दीर्घकालीन विजय मिळवायचा असेल तर शत्रूची खरी ओळख करून घेणे आणि युद्धास सज्ज होणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.
(माझा हा लेख दि. २८ जुलै २०११ रोजीच्या ’मुंबई तरुण भारत’मध्ये प्रकाशित झाला आहे.)

1 comment:

  1. संपूर्ण असहमत.
    खूप त्रोटक माहितीवर आधारलेला लेख आहे.

    बाबरी नंतरच देशात दहशतवादि हल्ले सुरु झाले आहेत. भारत पाकिस्तान हे युध्द दोन देशामधील आहे, दोन धर्मा मधील नाही, आणि या झगड्याचे मूळ कारण आहे कश्मीर.
    ज्याला जागतिक दहशतवाद असे म्हणता, तो काही विकसित देशांपर्यंतच सीमित आहे. अमेरिकेतील प्रत्येक गोष्ट जागतिक असते असा तेथील लोकांचा, सरकारचा आणि पर्यायाने मिडीयाचा गैरसमज असतो. आज इस्रायल वर्षा गणिक आपल्या सीमा वाढवीत आहे. आणि तरी हि तेथील स्थानिकांनी बांगड्यां घालून बसावे का ? आणि याला आपण दहशतवाद म्हणणार आहोत का ?
    अमेरिका आणि त्याची मित्र राष्ट्रे १९ व्या शतका पासून पूर्वेकडे जो धुडगूस घालीत आहे तो आजतागायत चालू आहे, मग तेथील स्थानिकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले तर यात काय वाईट. धर्म त्यांचे एक होण्याचे साधन आहे. अर्थात त्यातही विकृती आहेच, पण ते सर्वच धर्मांध आहेत हे मात्र चूक.

    आणि भारतात बाबरी नंतर जे काही झाल त्याची प्रतिक्रिया म्हणजे आजचा दहशतवाद, भारत सरकार हा दहशतवाद पाकिस्तानच्या माथी मारून स्वतः ची सुटका करतो आहे, इस्लाम जरी बाहेरून आला असेल तरी,

    आणि सगळ्यात महत्वाचे. मुस्लिमांचे शत्रुत्व पत्करून देश उभारणी करण्याची कसरत करू नये. ज्या मुद्यावरून पाकिस्तानशी शत्रुत्व आहे त्या कश्मीरचा ३० टक्क्याहून जास्त भाग हा चीन ने काबीज केला आहे. सध्याच्या बदलत्या जागतिक राजकारणानुसार पुन्हा एकदा विचार करावा लागेल खरा शत्रू कोण ? कोण कोणाच्या खाद्यावर बंदूक ठेऊन वार करीत आहे हे हि ठरवावे लागेल. पाकिस्तान सध्या पूर्ण पणे अमेरिकेच्या पाठबळावर उभा आहे. लादेन पाकिस्तानात सापडला तरी अजून हे पाठबळ चालूच आहे. याला शासनाची नीती म्हणतात. आणि आंतरराष्टीय स्तरावर हि जास्तच भयानक होते, मानवतावाद कुठे गळून पडतो कोणास ठाऊक.

    भारत पाकिस्तान युध्द थांबविता येतील, पण त्याच्या साठी शासकाच्या भूमिकेतून बाहेर पडायला हवे. कश्मीर बद्दल विचार न करता तेथील लोकांन बद्दल विचार करावा तो जास्त चांगला. या चर्चेत तेथील लोकांना सामाऊन घ्यावे. जो काय निर्णय होईल तो मान्य करावा.
    खूप सोप्प आहे हे. लोकशाही पद्धतीने हा प्रश्न निकालात काढता येईल, पण अर्थात त्यासाठी मानसिकता हवी.
    लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या व्यवस्थेत कागदी कपट्याला जास्त महत्व असू नये. महत्व मानवाच्या सुखाला असावे. उगाच नसते कायदे बनून, ते आकाश्यातून टपकले अश्या मूर्ख भावनेतून त्यावर अडून बसण्यात काही फायदा नाही. देशात असेही लोक आहेत ज्यांना कश्मीर मुद्या पेक्षा सकाळ, दुपार आणि सध्याकाळच्या जेवणाचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो. लोकशाही व्यवस्थेत या सर्वांचा विचार व्हायला हवा. अन्यथा या व्यवस्थेस लोकशाही व्यवस्था म्हणू नये.

    ReplyDelete