Friday 13 April 2012

बाबासाहेब सर्व समाजासाठी ‘आपले’ व्हावेत!


माझ्या मनात नेहमी दरिद्री, गरीब वर्ग व दलित समाजाबद्दल ममत्व असते. हे माझ्या मित्रपरिवारात जवळजवळ सगळ्यांना ठाऊक आहे. माझा ब्राह्मण समाजाबद्दल आकस नाही, पण समाजाची ही स्थिती होण्यात सनातनी ब्राह्मण वर्गाचा मोठा वाटा आहे, हे माझे मत आहे. माझी ही मते सर्वज्ञात असल्यामुळे काल माझा एक मित्र सहज हसता हसता म्हणाला की, ‘‘उद्या तुमच्याबाबांची जयंती आहे ना?’’ त्याच्या म्हणण्यातील तुमच्याहे आपल्या समाजाची खरी मन:स्थिती सांगून जाते. आजही सर्व समाजाने बाबासाहेबांना आपलेसे मानले नाही, हेच यातून ध्वनीत होते.

बाबासाहेबांनी गावाकुसाबाहेरच्या लोकांना समाजात मान मिळवून देण्यासाठी आयुष्य खर्ची केले. त्यामुळे हा समाज आत्मविश्‍वासाने उभा राहू शकला. समाजाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट होऊ शकला. या समाजासाठी जर कोणी अशाप्रकारचे कार्य केले नसते, तर कदाचित आज या समाजातसुद्धा नक्षलवादासारखी एखादी दहशतवादी चळवळ उभी राहिली असती आणि आमच्या नक्षलवाद्यांप्रमाणे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध उभा ठाकला असता. दलित, हरिजन आदी केवळ अशी नावे देऊन ही जनता समाजाच्या मुख्य प्रवाहात येणं शक्य नव्हते. त्यासाठी बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण जीवनाचा यज्ञ करावा लागला आहे.

या दृष्टिकोनातून पाहिल्यावर कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या कार्याचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होईल. दुर्दैवाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारी पातळीवर सन्मान फक्त कॉंग्रेसशी एकनिष्ठता दाखवणार्‍यांना प्राप्त झाला. त्यात स्वा. सावरकर व डॉ. आंबेडकर हे तर कुठेच मोडले जात नाहीत. त्यामुळे सरकारी पातळीवर या व इतर महनीयांना राष्ट्रीय सन्मान मिळण्याची शक्यताच नाही व आपल्या दृष्टीने तर कॅलेंडरवर जयंती व पुण्यतिथीची नोंद असते, या व्यतिरिक्त यांचे काहीच मोल नाही. या वर्षी तर रविवारला लागून आल्यामुळे आंबेडकर जयंती म्हणजे मोठा विकेंड (साप्ताहिक सुटी) अशीच सगळ्यांची भावना झाली आहे.

समाजाचा हा दृष्टीकोन बदलला जाण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा आपला समाज हा राष्ट्रीय समाजम्हणून कधी एकसंध होण्याची शक्यताच नाही.

1 comment:

  1. Dalit community and Party like BSP should not proclaim on the Bharat Ratna Dr B.R. Ambedkar their own ancestral property. Mr. Ambedkar belonged to every individual of this world as he had universal vision for human kind. He tried his best to associate the society from Swarada to Dalit. Unfortunately, both communities didn’t succeed it as of now.

    ReplyDelete