Thursday 19 April 2012

बेकायदा दारुविक्रीला विरोध करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला

बेकायदा दारुविक्रीला विरोध करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला


मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी: बेकायदा गावठी दारुधंद्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देऊन ते धंदे बंद करणाऱ्या रा. स्व. संघाच्या एका कार्यकर्त्यांवर आज दारुगुत्त्याच्या मालकाने प्राणघातक हल्ला केला. हा कार्यकर्ता सुदैवाने वाचला; मात्र या सुराहल्ल्यात त्याच्या खांद्यावर तसेच पंजावर खोल जखमा झाल्या आहेत. गोरेगाव (पूर्व) येथील उडपी हॉटेलनजीकच्या नौपाडा या वस्तीत अनेक वर्षांपासून गावठी दारूचे बेकायदा धंदे चालत होते. दारू विकणाऱ्यांची दादागिरी तसेच ती घेण्यासाठी येणाऱ्यांचे असभ्य वर्तन यामुळे संध्याकाळनंतर मुली व स्त्रियांना बाहेर पडणेही मुश्किल होत असे. वस्तीतील अनेक लोकही दारू पित असल्याने संसाराची वाताहत होण्याचेही प्रकार घडले आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे वस्तीतील तरुण मंडळींनी हे गुत्ते बंद पाडण्याचा निर्धार केला. दीपक मयेकर, शैलेश व दिनेश राजपुत हे भाऊ, निलेश शिगवण, जगदीश तळवडे आदी संघस्वयंसेवक तसेच दीपक रामाणे, राजन कदम, श्रीमती पूनम मोरे आदी मंडळींनी पोलिसांना निवेदन देऊन हे गुत्ते बंद करण्याची विनंती केली. वस्तीनेही त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. अनेक महिने ही प्रक्रिया सुरू होती. या काळात अनेक कार्यकर्त्यांवर गुत्तेदारांनी हल्ले केले, त्यांना धमक्या दिल्या. मात्र या मंडळींनी या दहशतीला दाद न देता आपला लढा सुरूच ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांना पोलिसांनी सहकार्य दिल्याने अखेर हे गुत्ते पूर्णपणे बंद झाले. तसेच वातावरणही सुधारले. ते तसेच राहावे यासाठी पोलिसांनीही गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. वनराई पोलीस ठाण्याच्या श्रीपाद गुंजकर, अरविंद माने, खांदवे आदी अधिकाऱ्यांनी त्यात पुढाकार घेतला होता.

या प्रकारानंतर दारुविक्री पूर्ण बंद झाली होती. परंतु गुत्तेदार हेमंत देसाई याने मात्र याचा राग मनात ठेवला होता. रविवारी सायंकाळी वस्तीतील एकाचे निधन झाले. त्याच्या अन्त्यसंस्कारांसाठी रात्री १२ च्या सुमारास जोगेश्वरीच्या प्रतापनगर स्मशानभूमीत हे सगळे कार्यकर्ते तसेच हेमंत देसाईसुद्धा गेला होता. त्याने एक मोठा सुरा जवळ बाळगला होता. अन्त्यविधी सुरू असतानाच त्याने शैलेश राजपुत याच्यावर मागून वार केला. शैलेशच्या ते लक्षात येताच त्याने तो चुकविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुऱ्याचा वार त्याच्या उजव्या खांद्यावर लागला. हेमंतने पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु शैलेशने डाव्या हाताने सुरा धरून ठेवल्याने त्याचा पंजा फाटला. दरम्यान, इतर मंडळींनी धाव घेऊन शैलेशला वाचविले. हेमंतला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यातही त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार केले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment