Friday 27 April 2012

भ्रष्टाचाराची जननी कॉंग्रेसला ‘बंगारू’ प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही


तहलका प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना आज सीबीआय कोर्टाने दोषी घोषित केले. यावरून आज दिवसभर सगळी प्रसारमाध्यमे भाजपवर आगपाखड करत आहेत. गेल्या काही काळापासून कॉंग्रेसला वेठीस धरणार्‍या भाजप पक्षाचे माजी अध्यक्षच कसे भ्रष्टाचारी आहेत, हे हिरहिरीने सबसे तेजपद्धतीने मांडण्याची चढोओढ सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी पत्रकारांनासमोर फिल्मी डायलॉग मारून गेले की, ‘‘जिन के घर शिशे के होते है, वोह दुसरे के घर पे मिट्टी और पत्थर नही मारा करते|’’ तिवारींची डायलॉग डिलिव्हरी पाहून सिने अभिनेते राजकुमार आणि दिलीप कुमारची आठवण होते.

माजी भाजपाध्यक्ष बंगारू लक्ष्मण भ्रष्ट असतीलही, त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल न्यायालय योग्य ती शिक्षा नक्कीच करेल. पण येथे मुख्य प्रश्‍न हा उपस्थित होतो की, गेल्या चार दिवसांपासून ज्या महत्त्वाच्या विषयांवर माध्यमे चर्चा घडवून आणत होते, ते विषय लगेल मार्गी लागले का? आठवड्याच्या सुरुवातीलाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी हे सेक्स स्कँडलमध्ये अडकून त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. बुधवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी व विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावांची चर्चा असलेले बोफोर्स प्रकरण पुन्हा चर्चेत आले. संसदेत भाजप व डाव्यांसह सर्वच विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला धारेवर धरले.

इतक्या महत्त्वाच्या विषयांवर सुरू असलेल्या चर्चांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरिता कॉंग्रेसचे काल सचिन तेंडुलकर व सिने अभिनेत्री रेखा हिला राज्यसभेवर घेऊ केले. माध्यमांनी लगेच चर्चेचा विषय बदलत 'सचिनने राजकारणात जावे की नाही?', इथपासून ते 'रेखा आणि जया एकाच घरात, म्हणजे जे अमिताभ करू शकला नाही, ते कॉंग्रेसने करून दाखवले'; अशा प्रकारची वाचाळ बडबड घडवून आणली.

बंगारू लक्ष्मण यांच्यावर लाच घेतल्यालाचा आरोप आहे, पण तो आकडा किती आहे, तर केवळ एक लाख रुपये. एक लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी भाजपला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉंग्रेसने बोफोर्स घोटाळ्यापासून ते कोळसा घोटाळ्यापर्यंत कोटींच्या कोटी किती खाल्ले आहेत, याची नुसती बेरीज करून पाहावी.

कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेले उदाहरणार्थ काही घोटाळे

- सन १९४८ साली पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात जीप घोटाळा (सुमारे रक्कम ८० कोटी)
- सन १९५८ मुंध्रा घोटाळा (सुमारे रक्कम १.२ कोटी)
- सन १९७१ सालचा नगरवाल घोटाळा (रक्कम सुमारे ६० लाख)
- महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या नावाची चर्चा असलेला १९८१ सालचा सिमेंट घोटाळा (रक्कम सुमारे ३० कोटी)
- १९८७ सालापासून आजपर्यंत ज्याची चर्चा सुरू आहे आणि ज्यात प्रत्यक्ष तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घेतले जाते, तो बोफोर्स घोटाळा
- कॉंग्रेसचे माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना ज्यात प्रत्यक्ष शिक्षा झाली तो १९९६ सालचा दूरसंचार घोटाळा
यासह सध्या चर्चेत असलेले युपीएचे प्रत्यक्ष मंत्री तुरुंगात असलेला बहुचर्चित २-जी घोटाळा व कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा हे तर सर्वपरिचित आहेत.

भारतीय जनता पक्षही बंगारू प्रकरणात लगेल बचावाच्या पवित्र्यात जाताना दिसतो. विरोधक सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को!या पवित्र्यात असतात आणि तुम्ही मात्र सोवळ अंगावर घेऊन चिडीचुप होता...

भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपाने नेहमी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसून आली आहे, मग ते हवाला कांडअसोत की कर्नाटकचे खाण प्रकरणअसो. दक्षिणेत कमळ फुलवून दाखवण्याची किमया करणार्‍या येड्डियुरप्पांना भाजपने मुख्यमंत्रीपदावरून दूर केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपला बोल लावण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही.

या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका येते ती माध्यमांची. माध्यमांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणार्‍या अण्णा हजारेंना मोठे केले. त्यांना राष्ट्रीय नेता केले. मग हिच माध्यमे सर्व भ्रष्टाचाराची जननी असणार्‍या कॉंग्रेसला अडचणीत आणण्यापेक्षा तिला तारणहार म्हणून का धाव घेतात?

No comments:

Post a Comment