Friday 28 December 2012

तरच रोखले जाऊ शकतात बलात्कार!


काही वर्षांपूर्वी संघाची शाखा कार्यवाह अशी जबाबदारी होती. बालांची शाखा होती आमची. बाल शाखा म्हणजे अगदी पहिलीत जाणार्‍या मुलांपासून मुलं यायची. तेव्हाचा एक किस्सा आठवतोय.

शाखा सुटल्यावर सगळ्या बालांसोबत गप्पा, मस्ती करत आम्ही घराकडे परतत होतो. वाटेत दोन मुली घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या आमच्याकडे आल्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘काही मुलं सायकलवरून फिरत आहेत. अंधारात मुली एकट्या दिसल्या की त्यांच्या अंगाला हात लावून पळून जातात. प्लिज आम्हाला मदत करा.’’

आम्ही तरुणांनी आमच्या बहिणींना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत सोडलं. त्यानंतर काही दिवस त्या रस्त्यांवर पहारा करणं, अशा गुंडांचा शोध घेण हा आमच्या शाखेचा उपक्रम झालेला.

दिल्लीत काही दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्कार झाला. आज सिंगापूरला रुग्णालयात त्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली आहे. त्या बलात्कारानंतर बरेच तरुण हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले. मीडियाने या निदर्शनांना सर्वतोपरी प्रसिद्धी दिली. त्यांचा त्यातच धंदा आहे, हे जरी खरं असलं तरी अशा गोष्टींना सर्वतोपरी प्रसिद्धी देऊन त्यांनी चांगल्या गोष्टीच्या मागे आम्ही उभे आहोत हेच दाखवून दिलंय, असं माझं मत आहे. प्रसिद्धीच्या झोतात अनेक चुकीच्या गोष्टीही घडल्याच! पण त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही.

इथे मुद्दा हा येतो की आपले तरुण निदर्शन करायला रस्त्यावर उतरू लागले आहेत. या निदर्शनांच्या दरम्यान दिल्ली किती असुरक्षित आहे याचीसुद्धा सवंग चर्चा झाली. पुढे ही चर्चा दिल्लीच असुरक्षित नाही, तर सारा देश स्त्रियांच्या दृष्टीने किती असुरक्षित आहे, हेही समोर आलं.

एक प्रश्‍न येथे उपस्थित करावासा वाटतो, तरुण निदर्शन करायला बाहेर पडू लागले आहेत, तर संरक्षणाला का नाही? निदर्शन करणं ही प्रतिक्रीया आहे. प्रतिक्रिया देण्यासाठी एखादी दुर्घटना होण्याची वाट का पाहावी?सुरुवातीच्या किस्स्यामध्ये संघाचा उल्लेख केलाय तो संघकामाची जाहिरात करण्यासाठी नाही. अशा प्रकारचा अनुभव समाजात पुरुषार्थ जागृत करणार्‍या अनेक संस्था/संघटनांना आला असेलच. अगदी कॉंग्रेसच्या सेवा दलाला अथवा कम्युनिस्टांनासुद्धा. जसे संघाचे स्वयंसेवक म्हणून आम्ही कृती केली तशीच कृती या संघटनाही करतील, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपले तरुण फक्त निदर्शनांसाठी बाहेर पडत आहेत. अशा विधायक कामांसाठी बाहेर पडून, अशा विधायक कामांना नित्यनेमाने वेळ देऊन बलात्कारासारख्या घटना या समाजात होणारच नाहीत, असा समाज निर्माण करण्यासाठी ते बाहेत पडतील तेव्हाच हे रोखले जाईल. कृपया विचार करा...

No comments:

Post a Comment